माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


रिस्क - तळीराम

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...

मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!

मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||

No comments:

Post a Comment

Leave your comment here

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा