माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


तिचा रुमाल

जो दरवळायचा कधी तिच्या गंधानी
तो भिजत राहतो आता माझ्या आसवांनी
तिचा तो धुंद, मंद गंधही नाही
तिचा तो हळुवार स्पर्शही नाही
तिचा तो मधात भिजवलेला आवाजही नाही
हुरहुर लावणारी, काळीज चिरणारी तिची ती नजरही नाही
फक्त तिच्या आठवणींचे धागे जपत,
माझ्यासारखा आरवार होतो,
माझ्या आसवांत भिजत राहतो;
तिचा रुमाल…….

ती तोडून जाईल सगळे धागे
तिचा गंधही उरणार नाही मागे
तिला कळणार नाही माझी वेदना
ती ऎकणार ही नाही माझे रडणे
ती विसरुन जाईल शपथा वचने
विसरुन माझ्या स्पर्शाची थरथर
ती होईल त्याच्या स्पर्शासाठी आतुर
माझ्यासारखा आरवार होईल,
माझ्या आसवांत भिजत राहिल;
तिचा रुमाल…….
पण काहितरी बदलतयं

मी तसा चिडणारा,
कपाळाला आठी घेउन वावरणारा
सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा
एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा

पण काहितरी बदलतयं…
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय
तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं
तिची हसरी नजर मलाही हसवतेयं
‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा
सगळंच अपरिचित
आणि तिचं माझ्यावरील प्रेम
अगदिचं अनपेक्षित
तू काय पाहिलसं माझ्यात
हा प्रश्नही अनुत्तरीत
आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात
हा शोधही अवचित

पण काहितरी बदलतयं…
कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं
ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा
असं उगाचंच वाटतयं
ते हरवलेले क्षण, ते हरवलेले दिवस
आणि तो अविरत झिरपणारा कडवडपणा
हे सगळं विसरता येईल असं जाणवतयं
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं
तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं
एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं
माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं
फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय
बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं
पाऊस कधीचा पडतो

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझयाच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा
रिस्क - तळीराम

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही
मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...

मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!

मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||
स्वप्नाची समाप्ति

स्नेहहीन ज्योतीपरी
मंद होई शुक्रतारा
काळ्या मेघखंडास त्या
किनारती निळ्या धारा.

स्वप्नासम एक एक
तारा विरे आकाशांत
खिरे रात्र कणकण
प्रकाशाच्या सागरांत.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांदण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.

रातपाखरांचा आर्त
नाद नच कानीं पडे
संपवुनी भावगीत
झोंपलेले रातकिडे.

पहांटचे गार वारे
चोरट्यानें जगावर
येती, पाय वाजतात
वाळलेल्या पानांवर.

शांति आणि विषण्णता
दाटलेली दिशांतुन
गजबज गर्जवील
जग घटकेनें दोन !

जमूं लागलेले दंव
गवताच्या पातीवर
भासतें भू तारकांच्या
आसवांनीं ओलसर.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्यांचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत

प्राजक्ताच्या पावलाशीं
पडे दूर पुष्प-रास
वार्‍यावर वाहती हे
त्याचे दाटलेले श्वास.

ध्येय, प्रेम, आशा यांची
होतसे का कधीं पूर्ती
वेड्यापरी पूजतों या
आम्ही भंगणार्‍या मूर्ती

खळ्यामध्यें बांधलेले
बैल होवोनिया जागे
गळ्यांतील घुंगरांचा
नाद कानीं येऊं लागे.

आकृतींना दूरच्या त्या
येऊं लागे रूप-रङ्ग
हालचाल कुजबूज
होऊं लागे जागोजाग.

काढ सखे, गळ्यांतील
तुझे चांद्ण्याचे हात
क्षितिजाच्या पलिकडे
उभे दिवसाचे दूत.

होते म्हणूं स्वप्न एक
एक रात्र पाहिलेलें
होतें म्हणूं वेड एक
एक रात्र राहिलेले.

प्रकाशाच्या पावलांची
चाहूल ये कानावर
ध्वज त्याचे कनकाचे
लागतील गडावर.

ओततील आग जगी
दूत त्याचे लक्षावधी
उजेडांत दिसूं वेडे
आणि ठरूं अपराधी.
“कणा “ - कुसुमाग्रज

‘ओळखलत का सर मला?’
पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले,
केसांवरती पाणी.

क्षणभर बसला
नंतर हसला
बोलला वरती पाहून
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी,
बायको मात्र वाचली.

भिंत खचली,
चूल विझली,
होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे
सर आता लढतो
आहेपडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत
उठला‘पैसे नकोत सर,
जरा एकटेपणा वाटला.
आई - कविवर्य श्री. फ. मु. शिंदे

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!
एका तळ्यात होती - ग.दि.माडगुळकर

एका तळ्यात होती,
बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई,
खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे
ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला,
म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी,
भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी,
सांगेल ते कुणाशी ?

जे ते तयास टोची,
दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू,
पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे,
वार्‍यासवे पळाले

पाण्यात पाहताना,
चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक
आपणच

आपणच आपल्याला लिहलेली
पत्रं वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वा~यावर पानं....

थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं.......

आपणच जपावेत मनात;
वा~यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास्......

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यानाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास........
गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.
सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.

- कुसुमाग्रज
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले

मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?

तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”
स्वातंत्र्यदेवीची विनवणी

पन्नशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥

सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत करू नका ॥

अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठारी दिवाभीतासम दडू नका ॥

जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥

वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतील दुसरे, बघतील तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥

जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालून, मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥

बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥

सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने ।
करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥

प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता, तिथे नष्टता, शंखच पोकळ फुंकू नका ॥

पाप कृपणता, पुण्य सदयता, संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥

-- कुसुमाग्रज
समिधा

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता

खळखळे अडखळे सुके कधी फेसाळॆ
परी अखंड शोधे वाट समुद्राकरिता

खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली

नच रम्य राउळे कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परी अंकुरती वेली

नव पर्णांच्या ह्या विरळ मांड्वाखाली
होईल सावली कुणा कुणास कहाली

कोपेल कुणी शापील कुणी दुर्वास
ह्या जळोत समिधा भव्य हवी व्रुक्षाली

"समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलांपरि वा मकरंद मिळावा ?

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा
तव आन्तर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!"

कवितासंग्रह - विशाखा
पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कवी - बा. सी. मर्ढेकर
सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा ,
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

सांग सांग भोलानाथ... सांग सांग भोलानाथ...

कवी – मंगेश पाडगावकर
आगगाडी आणि जमीन

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!
नवलाख तळपती दीप विजेचे येथ

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात !

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध !

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट !

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुल केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग !

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुल केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास !

गीत - कुसुमाग्रज
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची

भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची

कुठे दिवा नव्हता, गगनी एक ही न तारा
आंधळ्या तमातुन वाहे आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा भीतिच्या विषाची

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती
नावगाव टाकुनि आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती तुझ्या साहसाची

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा प्रीतिच्या रसाची

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाहि भोवळ आली मधुर सुवासाची

गीत - मंगेश पाडगावकर
परीकथेतिल राजकुमारा

परीकथेतिल राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
’राणी अपुली’ मला म्हणोनी,
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसा रात्री नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जिवाला,
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गाली येइल लाली
फुलापरी ही तनू कापरी,
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी
साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले,
स्वप्नच माझे होशील का ?
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती

चंद्र कोवळा पहिलावहिला
झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनी जाय उजळुनी काळोखाच्या राती

फुलून येता फूल बोलले
मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर परी निरंतर गंधित झाली माती

हात एक तो हळु थरथरला
पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी अजून जळती वाती

कुठे कुणाच्या घडल्या भेटी
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजुनही गाती

गीत - मंगेश पाडगावकर
दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे.

शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हरघडी अश्रू वाळविले नहीत,पण असेही क्शण आले
तेव्हा अश्रूच मित्र होउन साहय्यास धवून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला अता जगमय झालो
दु:ख पेलावे कसे,पुन्हा जगवे कसे;याच शाळेत शिकलो.

हे हात माझे सर्वस्व, दरिद्र्यकडेच गहाणच रहिले
कधी माना उंच्वलेले,कधी कलम झालेले पहिले.

झोतभट्टित शेकवे तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले;दोन दु:खात गेले

- नारायण सुर्वे
प्रतीक्षा

तीर मारला तुम्हिच नेमका मुक्त पाखरावरी
जात ते असतना अंबरी
हतबल होउन आणि बापडे पडता पायावरी
निष्ठुरा, कसे जाहला दुरी !

दूर जाहला कसे म्हणू पण असता मूर्ती तरी
सदा या ह्रदयाच्या मंदिरी
कुठे जिवलगा, शिकला असली कठोर जादुगिरी
जुलुम का असला अबलेवरी !

ओतून चंद्रिका आग लावली अशी
शेजेत भिजे ही अश्रूंनी मम उशी
कर गळ्यात घालुन मान कापली कशी !
मळा पेरुनी फुलाफळांचा बहर यायचा परी

परंतु गेला शेतकरी !
वसन्त ऋतुने आम्रावरची बहरुनि ये मंजरी
उडाला कोकिल कोठे तरी !
किती सारून दूर झालरी टक लावू दुरवरी

प्रियकरा, शून्य क्षितिजावरी
रोज उगवती चंद्रसूर्य ते परि माझ्या अन्तरी
नेहमी काळोखाची दरी
मी सुखात असता मऊ परांच्यावरी

या संगमवरी शीतल सौधांतरी
का चूड फेकली सर्व वैभवावरी
विझवाया हा वणवा राया, येशिल का लौकरी ?
ना तरी उतरिन मी पायरी !

वि.वा.शिरवाडकर
प्रेम आणि पतन

कुठ्ल्याशा जागी देख

बिल्डिंग मोड्की एक । पसरली.

चाळीत अशा वसणारी।

पोरगी कुणी्शी होती छबकडी !

जाताना नटुनी थटुनी

कुणी तरुण पाही ती तरुणी । एकला.

त्या क्षणी

त्याचिया मनी,

तरड:ति झणीं,

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी । नकळतां.

तो ठसा मनावर ठसला ।

तो घाव जिव्हारी बसला । त्याचिया

वेड पुरे लावी त्याला ।

चाळीतिल चंचल बाला बापडया !

अकलेचा बंधही सुटला ।

संबंध जगाशीं तुटला । त्यापुढें.

आशाहि,

कोणती कांहि,

राहिली नाहिं.

सारखा जाळी । ध्यास त्यास तिन्ही काळी । एक तो.

ही त्याची स्थिति पाहुनियां,।

चाळींतिल सारी दुनिया बडबडे.

इष्काचा जहरी प्याला।

नशिबाला ज्याच्या आला । हा असा.

धडपडत चाळिंतुनि फिरणें ।

तें त्याचें होतें जगणें । सारखें !

लोकांना नकळत बघणें ।

पिउनिया चहाला जगणें । गरमशा.

पटत ना,

त्याचिया मना,

जगीं जगपणा,

डाव तो टाकी । मनुजांतुनि दगडची बाकी । राहतो.

यापरी तपश्चर्या ती

किति झाली न तिला गणती । राहिली.

सांगती हिताच्या गोष्टी।

हातांत घेउनी काठी । लोक त्या

तो हंसे जरा उपहासें ।

मग सवेंच वदला त्रासें । चिडुनियां

'निष्प्रेम चिरंजीवन तें।

जगिं दगडालाही मिळ्तें । धिक तया'



निग्रहें,

वदुनि शब्द हे,

अधिक आग्रहें,

सोडिना चाळे । चाळीचे चढला माळे । तरुण तो.

पोरगी आलि मग तेथ ।

जोड्यांना धरुनि करांत । फाटक्या.

धांवली उताविळ होत ।

जोडा झणिं थोबाडांत । मारिला.

तिरमिरुनी खालीं पडला ।

परि पडतां पडतां हंसला । एकदां !

तो योग ।

खरा हटयोग ।

प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लागतें पडावें त्याला । हें असें !

कवी - अनंत काणेकर
स्फूर्ती - केशवसुत

काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
प्राशन करिता रंग जगाचे कणोकणी ते बदलू द्या !

अमुच्या भाळी कटकट लिहिली सदैव वटवट करण्याची,
म्हणेल जग आम्हांस मद्यपि पर्वा कसली मग याची !
जिव्हेची बंधने तर ढिली करा तीव्र या पेयाने,
यदुष्णतेने द्यावापृथ्वी द्रवुनि मिसळती वेगाने !
होउनिया मग दंग मनी,
व्हावे ते आणा ध्यानी,
गा मग सुचतिल ती गाणी,
परिसुनी त्यांचे शब्द, रुढीचे द्यास झणी ते खवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

सोमाचा रस वेदकाळच्या ऋषिवर्यांनी उकळीला,
शेष तयाचा द्या तर लौकर पिपासु जे त्या आम्हाला !
औचित्याच्या फोल विवेका, जा निघ त्या दुरवस्थेने
अम्हा घेरिले म्हणुनी घेतो झिंगुनिया या पानाने !
क्लृप्तीची मग करुनी नौका व्योमसागरावरी जाऊ
उडुरत्ने ती गरीब धरेला तेथुन फेकुनिया देऊ !
अडवतील जर देव, तरी
झगडू त्यांच्याशी निकरी
हार न खाऊ रतीभरी !
देवदानवा नरे निर्मीले हे मत लोकां कवळू द्या !
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !

पद्यपंक्तीची तरफ आमुच्या की विधीने दिली असे,
टेकुनि ती जनताशीर्षावरी जग उलथुन या देउ कसे !
बंडाचा तो झेंडा उभवुनी धामधूम जिकडे तिकडे.
उडवुनि देऊनि जुलुमाचे या करु पहा तुकडे तुकडे !
महादेव ! हरहर ! समराचा गर्जत तो वाऱ्यावरती
येउनि घुमतो अमुच्या कर्णी ..निजती ते ठारची मरती !
उठा उठा बांधा कमरा
मारा किंवा लढत मरा
सत्वाचा उदयोस्तु करा !
छंद फंद उच्छृंखल अमुचे स्तीमित जगाला ढवळू द्या
काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या !
दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी,

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी,

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,

गोठविनारा नको कडाका नको उन्हाचि होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी..

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.
अजुनि चालतोंची वाट - ए. पां. रेंदाळकर

अजुनि चालतोंची वाट ! माळ हा सरेना!
विश्रांतिस्थळ केव्हां यायचें कळेना !

त्राण न देहांत लेश, पाय टेकवेना,
गरगर शिर फिरत अजी होय पुरी दैना !

सुखकर संदेश अमित पोंचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलों दिवाणा !

कांटयांवरि घातलाचि जीव तयासाठीं
हंसवाया या केली किति आटाआटी!

हेंच खास घर माझें म्हणुनि शीण केला,
उमगुनि मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेंहि गेलीं,
निकट वाटतें जीवनसंध्या ही आली !

कुठुनि निघालों, कोठें जायचें न ठावें,
मार्गांतच काय सकल आयु सरुनि जावें !

काय निरुद्देश सर्व जीवन मम होतें
मरुसरितेपरि अवचित झरुनी जायचें ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आतां,
या धूळिंत दगडावर टेकलाच माथा !
आई म्हणोनी कोणी - यशवंत

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी

चार मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी
ती फुलराणी - बालकवी

हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
गोड निळ्या वातावरणात - अव्याज-मने होती डोलत;
प्रणयचंचला त्या भ्रूलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी;
याहुनि ठावे काय तियेला - साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात - डोलडोलवी हिरवे शेत;
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला-
"छानी माझी सोनुकली ती - कुणाकडे ग पाहत होती ?
कोण बरे त्या संध्येतून - हळुच पाहते डोकावून ?
तो रविकर का गोजिरवाणा - आवडला अमुच्या राणींना ?"
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी !

आन्दोली संध्येच्या बसुनी - झोके झोके घेते रजनी;
त्या रजनीचे नेत्र विलोल - नभी चमकती ते ग्रहगोल !
जादूटोणा त्यांनी केला - चैन पडेना फुलराणीला;
निजली शेते, निजले रान, - निजले प्राणी थोर लहान.
अजून जागी फुलराणि ही - आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा - काय जाहले फुलराणीला ?

या कुंजातुन त्या कुंजातुन - इवल्याश्या या दिवट्या लावुन,
मध्यरात्रिच्या निवान्त समयी - खेळ खेळते वनदेवी ही.
त्या देवीला ओव्या सुंदर - निर्झर गातो; त्या तालावर -
झुलुनि राहिले सगळे रान - स्वप्नसंगमी दंग होउन!
प्रणयचिंतनी विलीनवृत्ति - कुमारिका ही डोलत होती;
डुलता डुलता गुंग होउनी - स्वप्ने पाही मग फुलराणी -

"कुणी कुणाला आकाशात - प्रणयगायने होते गात;
हळुच मागुनी आले कोण - कुणी कुणा दे चुंबनदान !"
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति - विरहार्ता फुलराणी होती;
तो व्योमीच्या प्रेमदेवता - वाऱ्यावरती फिरता फिरता -
हळूच आल्या उतरुन खाली - फुलराणीसह करण्या केली.
परस्परांना खुणवुनि नयनी - त्या वदल्या ही अमुची राणी !

स्वर्गभूमीचा जुळ्वित हात - नाचनाचतो प्रभातवात;
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला - हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शान्ती - मंदमंद ये अवनीवरती;
विरू लागले संशयजाल, - संपत ये विरहाचा काल.
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि - हर्षनिर्भरा नटली अवनी;
स्वप्नसंगमी रंगत होती - तरीहि अजुनी फुलराणी ती!

तेजोमय नव मंडप केला, - लख्ख पांढरा दहा दिशाला,
जिकडे तिकडे उधळित मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती;
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी;
कुणी बांधिला गुलाबि फेटा - झकमणारा सुंदर मोठा!
आकाशी चंडोल चालला - हा वाङनिश्चय करावयाला;
हे थाटाचे लग्न कुणाचे - साध्या भोळ्या फुलराणीचे !

गाउ लागले मंगलपाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना!
नाचु लागले भारद्वाज, - वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर - नवरी ही फुलराणी सुंदर !
लग्न लागते! सावध सारे! सावध पक्षी ! सावध वारे !
दवमय हा अंतपट फिटला - भेटे रविकर फुलराणीला !

वधूवरांना दिव्य रवांनी, - कुणी गाइली मंगल गाणी;
त्यात कुणीसे गुंफित होते - परस्परांचे प्रेम ! अहा ते !
आणिक तेथिल वनदेवीही - दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी - फुलराणीची गोड कहाणी !
गुंतत गुंतत कवि त्या ठायी - स्फुर्तीसह विहराया जाई;
त्याने तर अभिषेकच केला - नवगीतांनी फुलराणीला !
पैठणी - शांता शेळके

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती
पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुष्म वास
ओळखीची.. अनोळखीची..
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
सौभाग्य मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा
भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी

कुसुमाग्रज
किती तरी दिवसांत - बा.सी.मर्ढेकर
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या - बी

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?



लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे

हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी


प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"
मरणांत खरोखर जग जगते - भा.रा.तांबे

मरणांत खरोखर जग जगते
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥

अनंत मरणे अधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥

सर्वस्वाचे दान अधीं करी
सर्वस्वच ये तुझ्या घरी
सर्वस्वाचा यज्ञ करी तरि
रे! स्वयें सैल बंधन पडते ॥ २ ॥

स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा
का यज्ञाविण काही मिळते? ॥ ३ ॥

सीता सति यज्ञीं दे निज बळि
उजळुनि ये सोन्याची पुतळी
बळी देऊनी बळी हो बळी
यज्ञेच पुढे पाऊल पडते ॥ ४ ॥

यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो
स्वसत्वदाने पाश छेदितो
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो
रे स्वभाव हा! उलटे भलते ॥ ५ ॥
प्रकृति-गती ही मनिं उपजुनियां
उठा वीर कार्पंण्य त्यजुनिया;
'जय हर!'गर्जा मातेस्तव या!
बडबडुनी काही का मिळते? ॥ ६ ॥
तहान - म. म. देशपांडे.
सारा अंधारच प्यावा
अशी लागावी तहान,
एका साध्या सत्यासाठी
देता यावे पंचप्राण ।।

व्हावे एव्हढे लहान
सारी मने कळों यावी,
असा लागावा जिव्हाळा
पाषाणाची फुले व्हावी ।।

फक्त मोठी असो छाती
सारे दुःख मापायला
गळो लाज गळो खंत
काही नको झाकायला ।।

राहो बनून आभाळ
माझा शेवटला श्वास
मना मनात उरो
फक्त प्रेमाचा सुवास ।।

- म. म. देशपांडे.
माणूस माझे नाव - बाबा आमटे

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...
बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातहि सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...
मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...
ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...
सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...
सरणार कधी रण - कुसुमाग्रज

सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे - यशवंत देव

हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा तोही पसंत आहे

दुःखावरी मुलामा देऊन तू सुखाचा
जे वाटतोस ते ते सारे पसंत आहे

विरता जुने प्रहार पडती नवीन घाव
तक्रार सांगण्याला कोठे उसंत आहे

मी भोगल्या व्यथांना साक्षी कुणी कशाला
माझाच एक अश्रू अजुनी जिवंत आहे

कधि सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे
माझ्या मना बन दगड - विंदा करंदीकर

माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अन्नाशिवाय, कपड्याशिवाय
ज्ञानाशिवाय, मानाशिवाय
कुडकुडणारे हे जीव
पाहू नको, डोळे शिव!
नको पाहू जिणे भकास,
ऐन रात्री होतील भास
छातीमधे अडेल श्वास,
विसर यांना दाब कढ
माझ्या मना बन दगड!

हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो!

हा रस्ता अटळ आहे !
येथेच असतात निशाचर
जागोजाग रस्त्यावर
असतात नाचत काळोखात;
हसतात विचकून काळे दात
आणि म्हणतात, कर हिंमत
आत्मा विक उचल किंमत!
माणूस मिथ्या, सोने सत्य
स्मरा त्याला स्मरा नित्य!
भिशील ऐकून असले वेद
बन दगड नको खेद!

बन दगड आजपासून
काय अडेल तुझ्यावाचून
गालावरचे खारे पाणी
पिऊन काय जगेल कोणी?
काय तुझे हे निःश्वास
मरणाऱ्याला देतील श्वास?
आणिक दुःख छातीफोडे
देईल त्यांना सुख थोडे?
आहे तेवढे दुःखच फार
माझ्या मना कर विचार
कर विचार हास रगड
माझ्या मना बन दगड

हा रस्ता अटळ आहे !
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक वेळ अशी येईल
घाणीचेच खत होईल
अन्यायाची सारी शिते
उठतील पुन्हा, होतील भुते
या सोन्याचे बनतील सूळ
सुळी जाईल सारे कूळ
ऐका टापा! ऐका आवाज!
लाल धूळ उडते आज
त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार!
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
मंद असावे जरा चांदणे - बा. भ. बोरकर

मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
गर्द कुंतलि तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी

दूर घुमावा तमांत पावा,जवळच व्याकूळ व्हावे पाणी
तूही कथावी रुसून अकारण सासू नणंदाची गाऱ्हाणी

सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे
आणि आंधळ्या भलेपणी मी तुला केधवा छळिले कैसे

उदासता अन सुखात कोठे कौलारांवर धूर दिसावा
असे निसटते बघून काही विषाद व्हावा जीवा विसावा

मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
करुणाभरल्या मुकाटपणी अन तुला धरावे जरा उराशी
मी तिला विचारलं - मंगेश पाडगांवकर

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......
सतारीचे बोल - केशवसुत

काळोखाची रजनी होती
हदयी भरल्या होत्या खंती
अंधारातचि गढले सारे
लक्ष्य, न लक्षी वरचे तारे
विमनस्कपणे स्वपदे उचलित,
रस्त्यातुन मी होतो हिंडत,
एका खिडकीतुनि सूर तदा
पडले.... दिड दा, दिड दा, दिड दा .....१

जड हृदयी जग जड हे याचा,
प्रत्यय होता प्रगटत साचा
जड ते खोटे हे मात्र कसें
ते न कळे, मज जडलेच पिसे
काय करावे, कोठे जावे,
नुमजे मजला की विष खावे
मग मज कैसे रुचतील वदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....२

सोसाट्याचे वादळ येते
तरि ते तेव्हा मज मानवते
भुते भोवती जरी आरडती
तरि ती खचितचि मज आवडती
कारण आतिल विषण्ण वृत्ती
बाह्य भैरवी धरिते प्रीती,
सहज कसे तिज करणार फिदा
रव ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....३

ऐकुनी तो मज जो त्वेष चढे
त्यासरशी त्या गवाक्षाकडे
मूठ वळुनि मी हात हिसकिला
पुटपुटलोही अपशब्दांला
महटले आटप आटप मूर्खा
सतार फोडुनि टाकिसी न का
पिरपिर कसली खुशालचंदा
करिसी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....४

सरलो पुढता चार पावले
तो मज न कळे काय जाहले
रुष्ट जरी मी सतारीवरी
गति मम वळली तरि माघारी
ध्वनिजाली त्या जणू गुंतलो
असा स्ववशता विसरुन बसलो..
एका ओट्यावरी स्थिर तदा
ऐकत .... दिड दा, दिड दा, दिड दा .....५

तेथ कोपरे अंकी टेकुनि
करांजलीला मस्तक देउनि
बसलो, इतक्यामाजी करुणा...
रसपूर्ण गती माझ्या श्रवणा
आकर्षुनि घे, हदय निघाले
तन्मय झाले द्रवले, आले
लोचनातुनी तोय कितिकदा
ऐकत असता .... दिड दा, दिड दा .....६

स्कंधी माझ्या हात ठेवुनी
आश्वासी मज गमले कोणी,
म्हणे.. खेद का इतुका करिसी
जिवास का बा असा त्राससी
धीर धरी रे धीरा पोटी
असती मोठी फळे गोमटी
ऐक मनीच्या हरितील गदा
ध्वनि हे ....दिड दा, दिड दा, दिड दा .....७

आशाप्रेरक निघू लागले
सूर तधी मी डोळे पुशिले
वरती मग मी नजर फिरवली
नक्षत्रे तो अगणित दिसली
अस्तित्वाची त्यांच्या नव्हती
हा वेळवरी दादच मज ती
तम अल्प..द्युति बहु या शब्दा
वदती रव ते दिड दा, दिड दा .....८

वाद्यातुनि त्या निघती नंतर
उदात्ततेचे पोषक सुस्वर
तो मज गमले विभूति माझी
स्फुरत पसरली विश्वामाजी,
दिक्कालांसह अतित झालो,
उगमी विलयी अनंत उरलो
विसरुनि गेलो अखिला भेदां
ऐकता असता .... दिड दा, दिड दा .....९

प्रेमरसाचे गोड बोल ते
वाद्य लागता बोलायाते
भुललो देखुनि सकलहि सुंदर
सुरांगना तो नाचति भूवर
स्वर्ग धरेला चुंबायाला
खाली लवला... मजला गमला
अशा वितरिती अत्यानंदा
ध्वनि ते .... दिड दा, दिड दा, दिड दा .....१०

शांत वाजली गती शेवटी,
शांत धरित्री शांत निशा ती
शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो
शांतीत अहा झोपी गेलो
बोल बोललो परी कितिकदा
स्वप्नी .... दिड दा, दिड दा, दिड दा .....११
माझे जीवनगाणे - कुसुमाग्रज
माझे जगणे होते गाणे

सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे
माझे मन तूझे झाले

माझे मन तूझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तूझे प्राण
उरले ना वेगळाले ॥

मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहीकडे
माझे तूझे होती भास ॥

माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तूझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी ॥

तुझी माझी पटे खूण
तुझी माझी हीच धून
तूझे प्राण माझे प्राण
माझे मन तूझे मन ॥

सुधीर मोघे
पालखीचे भोई - शंकर वैद्य

पाकखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥
अजुनी रुसून आहे...

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना ।

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरीला असा अबोला, की बोल बोलवेना ।

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला, ऐसी मिठी जुटे ना ।

की गूढ काही डाव, वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ।

कवी – अनिल [आ. रा. देशपांडे]
लागेल जन्मावें पुन्हा...

माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.

तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.

तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.

होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.

म्हणतेस तू, "मज आवडे रांगडा सीधेपणा!"
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.

लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.

कवी - विंदा करंदीकर
पाखरा येशिल का परतून?

मत्प्रेमाने दिल्या खुणांतुन एकतरी आठवून?
पाखरा...

हवे सवें मिसळल्या माझिया निश्वासा वळखून?
पाखरा...

वा‌‌र्‍यावरचा तरंग चंचल जाशिल तू भडकून!
पाखरा...

थांब घेऊदे रूप तुझे हे ह्रुदयी पूर्ण भरुन!
पाखरा...

जन्मवरी मजसवें पहा ही तवचंचूची खूण!
पाखरा...

विसर मला, परि अमर्याद जग राहीं नित्य जपून!
पाखरा...

ये आता घे शेवटचे हे अश्रू दोन पिऊन!
पाखरा येशिल का परतून?

कवी - ना. वा. टिळक.
आलाप

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते;
कुठेतरी मी उभाच होतो... कुठेतरी दैव नेत होते!

वसंत आला पुढे, तरीही सुगंध मी घेतलाच नाही;
उगीच का ताटवे फुलांचे मला शिव्याशाप देत होते?

कुठेतरी पाहिले तुला मी, जरी तुझे नाव आठवेना...
करू तरी काय? हाय, तेंव्हा खरेच डोळे नशेत होते!

असूनही बेचिराख जेंव्हा जगायचे श्रेय जिंकले मी,
कितीतरी लोक आसवांची प्रमाणपत्रेच घेत होते!

जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले, ते सुखात होते! मजेत होते!

बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो?
धुळीत बेवारशी कधीचे पडून माझेच प्रेत होते!

मला विचारू नकोस आता, कुठून हे शब्द आणले मी?
तुझेच आलाप काल रात्री उसासणार्‍या हवेत होते!

गझलकार - सुरेश भट.
केवढे हे क्रौर्य!

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी;
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला;
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करो जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना;
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी,
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं.

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला,
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा;
स्मरा मजबरोबरी परि दयाघना इश्वरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी;
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक;
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

कवी - ना. वा. टिळक.
सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विकत घेणाऱ्याला सलाम,
विकत घेण्याचा इशारा करणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबको सलाम.

वटारलेल्या प्रत्येक डोळ्याला सलाम,
शेंदूर थापलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळांतल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्मांचे कंत्राट घेणाऱ्यांना सलाम,
रिकाम्या हातातून उद काढणाऱ्या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भीतीच्या प्रत्येक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणाऱ्या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणाऱ्या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकावणाऱ्या
त्याच्या साहेबाला सलाम,
सलाम, प्यारे भाईयों और बेहेनों,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे, सभांचे
फोटोसकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणाऱ्या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणाऱ्या
जादूगारांना सलाम,
भाईयों और बेहेनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट़्टीवाल्याला सलाम,
स्मगलरला सलाम,
मटकेवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाही सलाम,
सत्तेचा ट्रक चालविणाऱ्यांना सलाम,
ट्रकखाली चिरडलेल्या
गांडुळांना, कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बॉंम्ब फेकणाऱ्यांना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापाऱ्यांना सलाम,
काळाबाजारवाल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणाऱ्यांना सलाम;
गटारातल्या पाण्याने इंजेक्शने भरणाऱ्यांना सलाम,
तिरडीचे समान विकणाऱ्यांना सलम,
तिरडी उचलणाऱ्या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणाऱ्या सर्वांना सलाम,
सलाम, प्यारे दोस्तों, सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळांतल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
गजकर्णी भिंतींना सलाम,
पिचलेल्या बायकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोर्वड्याला सलाम,
गाडीत चेंगरणाऱ्या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धंद्याच्या मालकाला सलाम,
युनियनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगाच्या सर्व झेंड्यांना सलाम,
चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणाऱ्या
प्रत्येक हाताला सलाम,
सलाम, भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

या माझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोषणांना सलाम,
जातिभेदांच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिउरडयांतून सत्तेचे पीक काढणाऱ्यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लॉऱ्यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अदृश्य बुक्क्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्क्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनातीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणाऱ्यांना सलाम,
या बातम्या वाचणाऱ्या सर्व षंढांना सलाम,
सलाम, भाईयों और भैनों, सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील ,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणाऱ्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणाऱ्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरून काढतील;
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझा
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
सलाम
प्यारे भाईयों और बेहेनों, सबको सलाम,

अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिन माफ़ करना भाईयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त
उजव्या हाताने सलाम,
सलाम, सबको सलाम
भाईयों और बेहेनों, सबको सलाम.

कवी - मंगेश पाडगावकर.
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिचं बोलणं, तिचं हसणं
जवळपास नसूनही जवळ असणं;
जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं
अचानक स्वप्नात दिसणं !

खटयाळ पावसात चिंब न्हायचं
माझं काय, तुमचं काय
प्रेमात पडलं की असच व्हायचं

केसांची बट तिने हळूच मागं सारली ...
डावा हात होता की उजवा हात होता?

आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण,
मनात आपल्या साठवतो

ती रुमाल विसरुन गेली !
विसरुन गेली की ठेवून गेली?
आपण सारखं आठवतो,
प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो

आठवणींचं चांदण
असं झेलून घ्यायचं !
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

तिची वाट बघत आपण उभे असतो ...
ठरलेली वेळ कधीच टळलेली !
येरझारा घालणंसुद्धा
शक्य नसतं रस्त्यावर,
सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली

माणसं येतात, माणसं जातात
आपल्याकडे संशयाने रोखून बघतात

उभे असतो आपण
आपले मोजीत श्वासः
एक तास ! चक्क अगदी एक तास !!

अशी आपली तपश्चर्या
आपलं त्राण तगवते
अखेर ती उगवते !

इतकी सहज! इतकी शांत !
चलबिचल मुळीच नाही,
ठरलेल्या वेळेआधीच
आली होती जशी काही !

मग तिचा मंजुळ प्रश्नः
"अय्या! तुम्ही आलात पण?"
आणि आपलं गोड उत्तरः
"नुकताच गं, तुझ्याआधी काही क्षण!"

काळावर मात अशी
तिच्यासोबत भुलत जायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं


एकच वचन
कितीदा देतो आपण
एकच शपथ कितीदा घेतो आपण ?

तरीसुद्धा आपले शब्द
प्रत्येक वेळी नवे असतात;
पुन्हा पुन्हा येऊनही
पुन्हा पुन्हा हवे असतात

साधंसुधं बोलताना
ती उगीच लाजू लगते,
फुलांची नाजूक गत
आपल्या मनात वाजू लागते

उत्सुक उत्सुक सरींनी
आभाळ आपल्या मनावर झरुन जातं;
भिजलेल्या मातीसारखं
आपलं असणं सुगंधाने भरुन जातं

भरलेल्या ढगासारखं
मनाचं भरलेपण उधळून द्यायचं;
माझं काय, तुमचं काय,
प्रेमात पडलं की असंच व्हायचं

कवी - मंगेश पाडगावकर
तुमचं काय गेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला
नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला,
लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला
भेटला तर भेटू दे की पेटला तर पेटू दे की !
तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं ?


त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली
पाऊस होता तरी
भिजत त्याच्या घरी गेली,
घरात तेव्हां कोणीच नव्हतं
म्हणून त्याचं फ़ावलं
तिला जवळ घेऊन
त्याने चक्क दार लावलं,
लावलं तर लावू दे की फावलं तर फावू दे की
तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

घरात जागा नसते हल्ली
त्यांच चालणारच टॅक्सीत प्रकरण,
ते थोडेच बसणार आहेत
घोकत पाणिनीचं व्याकरण,
गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच !
कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच
घेतले तर घेऊ दे की व्हायचे ते होऊ दे की
तुमच्या घरचं बोचकं त्याने थोडंच उचलून नेलं ?

त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं
करु दे की !
मला सांगा त्यात तुमचं काय गेलं ?

कवी - मंगेश पाडगावकर
प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं
म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणसं भेटतात !

असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला
फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी
प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !

आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”

त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात
कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं
खाल्लं असेल गोडीने !

भर दुपारी उन्हात कधी
तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने
तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !

दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

कवी - मंगेश पाडगावकर
अशीच यावी वेळ एकदा - प्रसाद कुलकर्णी

अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना
असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना

उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक
जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक

मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर
विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर

मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना
तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा

संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे
समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे

तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना
उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना

हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला
आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला

सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये
युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये

शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले
मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले.
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती

कवी - मंगेश पाडगावकर
म्हणालो नाही...

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी ?' ते ही 'सांग' म्हणालो नाही,
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती,
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी
'जा! फिटले सारे पांग!' म्हणालो नाही...

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी,
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग - म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे! तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे,
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग - म्हणालो नाही...

कवी - संदीप खरे
आकाश उजळले होते - सुरेश भट

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते
देणार्याने देत जावे - वि. दा. करन्दीकर

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !
तुतारी

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला आणुनी

अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?

रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!

चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!

धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!

धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थिर

हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर

नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!

घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!

पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

कवी - केशवसुत
प्रेम आणि मरण - गोविंदाग्रज

कुठल्याशा जागी देख।
मैदान मोकळे एक॥ पसरले॥
वृक्ष थोर एकच त्यात।
वाढला पुर्या जोमात॥सारखा॥
चहुकडेच त्याच्या भंवते।
गुडघाभर सारे जग तें॥तेथले॥
झुडुपेंच खुरट इवलालीं।
मातीत पसरल्या वेली॥माजती॥
रोज ती। कैक उपजती। आणखी मरती।
नाहिं त्या गणती। दादही अशांची नव्हती॥त्याप्रती॥

त्यासाठी मैदानात।
किती वेली तळमळतात॥ सारख्या॥
परि कर्माचें विंदान।
काहीं तरि असतें आन॥ चहुंकडे॥
कोणत्या मुहूर्तावरती।
मेघात वीज लखलखती। नाचली॥
त्या क्षणी। त्याचिया मनीं। तरंगति झणीं।
गोड तरि जहरी। प्रीतीच्या नवथर लहरी॥ न कळता॥

तो ठसा मनावर ठसला।
तो घाव जिव्हारीं बसला॥ प्रीतिचा॥
वेड पुरें लावी त्याला।
गगनातिल चंचल बाला। त्यावरी॥
जातिधर्म त्याचा सुटला।
संबंध जगशीं तुटला॥ त्यापुढें।
आशाहि। कोणती कांही। रहिली नाही।
सारखा जाळी। ध्यास त्यास तीन्ही काळी॥ एक तो॥

मुसळधार पाउस पडला।
तरि कधीं टवटवी त्याला॥ येइना॥
जरि वारा करि थैमान।
तरि हले न याचें पान॥ एकही॥
कैकदा कळ्याही आल्या।
नच फुलल्या कांही केल्या॥ परि कधीं॥
तो योग। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।
लागला ज्याला। - लागतें जगावें त्याला॥ हें असें!॥

ही त्याची स्थिति पाहुनिया।
ती दीड वीतिची दुनिया॥ बडबडे॥
कुणी हंसे कुणी करि कींव।
तडफडे कुणाचा जीव॥ त्यास्तव॥
कुणि दयाहि त्यावरि करिती।
स्वर्गस्थ देव मनिं हंसती॥ त्याप्रती॥
निंदिती। कुणी त्याप्रती। नजर चुकविती।
भीतिही कोणी। जड जगास अवघड गोणी॥ होइ तो॥

इष्काचा जहरी प्याला।
नशिबाच्या ज्याच्या आला॥ हा असा॥
टोंकाविण चालू मरणें।
ते त्याचे होतें जगणें॥ सारखें॥
ह्रदयाला फसवुनि हंसणें।
जीवाला न कळत जगणें॥ वरिवरी॥
पटत ना। जगीं जगपणा। त्याचिया मना॥
भाव त्या टाकी। देवांतुनि दगडचि बाकी॥ राहतो॥


यापरी तपश्चर्या ती।
कीती झाली न तिला गणती॥ राहिली॥

इंद्राच्या इन्द्रपदाला।

थरकांप सारखा सुटला॥ भीतिने॥

आश्चर्ये ऋषिगण दाटे।

ध्रुवबाळा मत्सर वाटे॥ पाहुनी॥

तों स्वतां। तपोदेवता। काल संपतां।

प्रकटली अंती। "वरं ब्रूहि" झाली वदती॥ त्याप्रती॥

"तप फळास आलें पाही।

माग जें मनोगत कांही॥ यावरी॥

हो चिरंजीव लवलाही।

कल्पवृक्ष दुसरा होई॥ नंदनीं॥

प्रळयींच्या वटवृक्षाचें।

तुज मिळेल पद भाग्याचें। तरुवरा॥"

तो वदे। "देवि सर्व-दे,। हेंच एक दे-।

भेटवी मजला। जीविंच्या जिवाची बाला॥ एकदा॥"

सांगती हिताच्या गोष्टी।

देवांच्या तेतिस कोटी॥ मग तया॥

"ही भलती आशा बा रे॥

सोडि तूं वेड हें सारें॥ घातकी॥

स्पर्शासह मरणहि आणी।

ती तुझ्या जिवाची राणी॥ त्या क्षणीं॥

ही अशी शुध्द राक्षसी। काय मागसी।

माग तूं कांहीं। लाभले कुणाला नाही॥ जें कधीं॥"

तो हंसे जरा उपहासें।

मग सवेंच वदला त्रासें॥ त्याप्रती॥

"निष्प्रेम चिरंजीवन तें।

जगिं दगडालाही मिळतें॥ धिक तया॥

क्षण एक पुरे प्रेमाचा।

वर्षाव पडो मरणांचा। मग पुढें॥"

निग्रहें। वदुनि शब्द हे। अधिक आग्रहें!

जीव आवरुनी। ध्यानस्थ बैसला फिरुनी॥ वृक्ष तो॥


तो निग्रह पाहुनि त्याचा॥

निरुपाय सर्व देवांचा॥ जाहला॥

मग त्याला भेटायाला।

गगनांतिल चंचल बाला॥ धाडिली॥

धांवली उताविळ होत।

प्रीतीची जळती ज्योत॥ त्याकडे॥

कडकडे। त्यावरी पडे। स्पर्श जों घडे।

वृक्ष उन्मळला। दुभंगून खालीं पडला॥ त्या क्षणीं॥

दुभंगून खालीं पडला।

परि पडतां पडतां हंसला॥ एकदा॥

हर्षाच्या येउन लहरी।

फडफडुनी पानें सारीं॥ हांसलीं॥

त्या कळ्या सर्वही फुलल्या॥

खुलल्या त्या कायम खुलल्या॥ अजुनिही॥

तो योग्। खरा हटयोग। प्रीतिचा रोग।

लागला ज्याला। लाभतें मरणही त्याला॥ हें असें॥
क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार

कवी - कुसुमाग्रज
"प्रेम कर भिल्लासारखं "

पुरे झाले चंद्र-सुर्य , पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा

मोरासारखा छातीकाढून उभा राहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला . . .
तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इन्द्रधनु बांधील काय?
उन्हाळ्यात्ल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत
जास्तित-जास्त १२ महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहिल काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वीवेळ
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवून सुध्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकुनकोस
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं
प्रेम कर भिल्लासा्रखं बाणावरती खोचलेलं...
- कुसुमाग्रज
विझता विझता स्वत:ला.....

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हांलाही आली; नाहीच असे नाही।

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही।

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप; नाहीत असे नाही।

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही।

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत्:ला सावारलेच नाही, असेही नाही।
प्रेम

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं

शोधून कधी सापडत नाही
मागुन कधी मिळत नाही
वादळ वेडं घुसतं तेव्हा
टाळू म्हणून टळत नाही

आकाश पाणी तारे वारे
सारे सारे ताजे होतात
वर्षाच्या विटलेल्या मनाला
आवेगांचे तुरे फुटतात

संभ्रम स्वप्न तळमळ सांत्वन
किती किती तर्‍हा असतात
साऱ्या सारख्याच जीवघेण्या
आणि खोल जिव्हारी ठसतात

प्रेमाच्या सफल-विफलतेला
खरंतर काही महत्त्व नसतं
इथल्या जय-पराजयात
एकच गहिरं सार्थक असतं

मात्र ते भोगण्यासाठी
एक उसळणारं मन लागतं
खुल्या सोनेरी ऊन्हासारखं
आयुष्यात प्रेम यावं लागतं

कवी - सुधीर मोघे
आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत
रिमझिम सरींनी छेडलं होतं,
भर दुपारी मला जणू
चांदण्याने वेढलं होतं.

आठवतं तुला त्या भेटीत
श्रावण धुंद बहरला होता,
ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने
ओला देह शहारला होता.

आठवतं तुला त्या भेटीत
दोघे व्याकुळ झालो होतो,
तुझा गंध वेचता वेचता
मीही बकुळ झालो होतो.

आठवतं तुला त्या भेटीत
भावनांनी कविता रचली होती,
माझ्या डोळ्यात तू अन
तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत
आणखी काय घडलं होतं?
मला स्मरत नाही पुढचं
बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं.


कवी - अभिजीत दाते.
जाणता राजा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥

परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।
तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ ।
सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठायी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

तीर्थेक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

देव-धर्म-गोब्राह्मण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥

उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक ।
धूर्त तार्किक सभानायक । तुमच्या ठायी ॥

या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥

आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।
धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥

कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांसी धाक सुटले ।
कित्येकांस आश्रय जाले । शिवकल्याण राजा ॥

तुमचे देशी वास्तव्य केले । परंतु वर्तमान नाही घेतले ।
ऋणानुबंधे विस्मरण जाले । काय नेणो ॥

सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काय तुम्हाप्रती ।
धर्मसंस्थापनेची कीर्ती । सांभाळिली पाहिजे ॥

उदंड राजकारण तटले । तेणे चित्त विभागले ।
प्रसंग नसता लिहिले । क्षमा केली पाहिजे ॥


समर्थ रामदासांनी छत्रपतींस लिहीलेल्या पत्रातून...
माथा व हाथ

तू म्हणालास माथा रक्ताळला
मी म्हणालो हातावर विश्वास ठेव
तू पुन्हा म्हणालास,
जिथं मथाच रक्ताळला
तिथं हातावर विश्वास कसला?
पण मित्रा,
हाथ माथा घडवत असतात
माथा हाथ न्हवे......
पाऊस

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही

कवी - संदीप खरे.
पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना !

नव्हाळीतले ना उमाळे, उसासे
न ती आग अंगात आता उरे
विझूनी अता यौवनाच्या मशाली
उरी राहिले काजळी कोपरे !

परी अंतरी प्रीतिची ज्योत जागे
अविश्रांत राहील अन् जागती;
न जाणे न नेणे कुठे चालले मी
कळे तू पुढे आणि मी मागुती !

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा,
मला वाटते विश्व अंधारले !

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेजःकण
मला मोहवाया बघे हा सुधांशु
तपाचार स्वीकारुनी दारुण.

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतिची लाजुनी लाल
होऊनिया लाजरा मंगळ.

निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्‍रुव
पिसाटापरी केस पिंजारुनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव !

परी भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे !

तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग, तूझ्या-
स्मृतीने उले अन् सले अन्तर !

गमे कीं तुझ्या रुद्र रुपात जावे
मिळोनी गळा घालुनीया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी
मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा !

अमर्याद मित्रा, तुझी थोरवी अन्
मला ज्ञात मी एक धूलीकण
अलंकारण्याला परी पाय तुझे
धुळीचेच आहे मला भूषण !
कोलंबसाचे गर्वगीत - कुसुमाग्रज

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....
कोरड्या झालेल्या मातीत....नाच नाच नाचला....

तेच थेंब,तेच पाणी...
पावसावरचीही तीच गाणी....
गाण्यातला सुर जरा तेवढा.....
एकटा एकटा वाटला....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

पाण्यातुन वाहणारी कागदाची होडी....
वाफाळलेला कपातील चहाची गोडी...
कप जुना तसाच... मात्र....
चहातलाच गोडवा आटला......

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

रस्त्यावरचा नकोसा चिखल सारा.....
घरा-घरात घुसणारा सोसाटयाचा वारा...
घरं अगदी तशीच उभी....
वाराच कसा दिशा भरकटला.....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

पावसामुळेच काय ते.. प्रेम-बिम जमलं होत......
एका हाताने.... दुस-या हाताला हळुच हातात घेतलं होत......
प्रेम कधीचच संपल....
कारण हातच कायमचा सुटला.....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला....

अश्रुंना तुझ्या या आवर रे आता....
दु:खातुन तु जरा सावर रे आता....
अश्रु कधीचेच आटले हो....
एक थेंब फक्त्त डोळ्यात साचला.....

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला.....
पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
बाबा

बाबा,
तुम्ही माझ्यासाठी आहात खुप्प काही
अन तुमच्यापासून मी तुटूच शकत नाही..

तुमच्याकडूनच तर शिकले,
क्षितीजापलीकडे पहायला..
अन अगदी आजपर्यंत निभावतेय सारं..
तुम्हीच..मला भक्कम उभं केलंत
अगदी धोकेदायक प्रसंगातूनही...
स्वत:ची स्वप्नं बाजू ठेवली....माझ्या स्वप्नपूर्तीसाठी..
कशी विसरु ?
तुम्ही केलेला त्याग..
म्हणूनच,
अंत:करण सांगतंय
बाबा,
तुम्ही माझ्यासाठी खुप्प काही आहात
तुमच्याशिवायचं आयुष्यंच मी जगू शकत नाही..

अजूनही ताजेच आहेत
तुम्ही संस्मरणीय केलेले क्षण..
जसे अगदी आत्ता घडलेलं असावेत असे..
ते आठवून हसता हसता
डोळ्यातलं पाणीही नाही रोखता येत मला..

वार्‍याच्या झुळूकीसारखे वर्ष निघून गेलेत
मला कोषातून बाहेर काढण्यासाठी
आणि पंख देण्यासाठी
आणि ,
आता....आता माझी स्वप्नं मला साद घालताहेत
मला जायलाच हवं..
त्या निळ्याशार आसमानाखाली उडतांना
स्पर्शाचंय मला इंद्रधनु
ढगांच्या अस्तरांमधून..

मी झेपावणार आहे, झेपावणार आहे
पण , परतण्यासाठी....
परतेल..
माझी यशाची मिळकत घेऊन ..
तुमचा आनंदित चेहरा बघण्यासाठी
तुम्हाला पुन्हा हसवण्यासाठी
माझा अभिमान वाटण्यासाठी..

मी लवकरच परतेल....
माझ्यासाठीही सोप्पं नसेल तुमच्या शिवाय जगणं..
कारण,
मला तर तुमच्याबरोबर रहायचंय..
माझ्या जगात..
अन माझं जग तर......तुम्हीच
सुरक्षित असं....
द स्पिरीट ऑफ मुंबई.....

द स्पिरीट ऑफ मुंबई.....
द स्पिरीट ऑफ मुंबई नेव्हर डाईज
नो मँटर व्हॉट्स हँपेन मुंबई डेफीनेटली फ्लाईज

पुन्हा होईल ति अगदी राखेतुनही जीवंत
वातावरण होईल इथलं अगदी पहील्यासारखंच शांत
ह्या मुंबईने हार कधी मानलीच नाही
भले काहीही होवो ही मुंबई कोणासाठी थांबलीच नाही

पुन्हा एकदा बसतील कबुतरे इथल्या रस्त्यांवर
डबेवाल्यांची तरेवरची कसरत पुन्हा सुरु होईल
ति नेहमीची नऊ-दहाची लोकल पकडण्यासाठी
नोकरदारांची नेहमीची धावपळ सुरु होईल

गजबजतील बाजार पुन्हा एकदा इथले
मरीन ड्राईव्ह नव्या तेजाने चमकेल
रात्रीजरी बघीतलात दुर आभाळतुन ईथे
मुंबई नेहमीच तुम्हाला जागीच दिसेल

संकटांना सामोरे जाण्याचे ब्रिद जपतेय मुंबई
तिचे गुपीत कोणाला कळलेच नाही
नेव्हर डाईंग स्पिरीट घेऊन जगतेय मुंबई
ति अश्या भ्याड हल्यांपुढे कधी झुकलीच नाही

As Long As There Is A SKY
Our Mumbai Will Never Die
जिप्सी

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आठवतें बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतों बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौलें पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवतें अजूनहि होतों रंगत मी किती !
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर … स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ … अंधुक … पुसट !
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून
(जिप्सी) -मंगेश पाडगांवकर
सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


- विनायक दामोदर सावरकर
सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.
यांचं असं का होतं कळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

निळं निळं वेल्हाळ पाखरु
आभाळात उडणार;
रुपेरी वेलांटी घेत
मासा पाण्यात बुडणार!

याचं सुख नसतंच मुळी
कधी यांच्या साठी!
एकच गोष्ट यांची असते;
कपाळावर आठी!!

कधी सुध्दा यांची पापणी ढळत नाही!
यांचं असं का होतं कळतं नाही,
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

मोठ्यानं हसा तुम्ही;
यांना नैतिक त्रास होतो!
वेलची खाल्लीत तरी ह्यांना
व्हीस्की चा वास येतो!!

यांचा घॊशा सुरु असतो:
अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं,
त्मकं मुळिच पिऊ नका,
त्याने पडसं होतं!!

संयमाचे पुतळेच हे!
यांचं नम चुकुनही चळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

सगळेच कसे बागेमधे
व्यायाम करत असणार?
किंवाअ हातात गिता घेउन
चिंतन करित बसणार?

बागेतल्या कोपऱुयात किणी
घट्ट बिलगुन बसतंच नां?
गालाला गाल लाउन
गुलु गुलु करित असतंच ना?

असं काही दिसलं की
यांचं डॊकं सणकलंच!
यांच्या अध्यात्माचं गळू
अवघड जागी ठणकलंच!!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या
वेगवान घोडं असतं:
पण यांना मुलं होतात
हे एक कोडंच असतं!!

या कठीण कोड्य़ाचं उत्तर मात्र मिळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

कसल्याही आनंदाला
हे सतत भित असत्त:
एअरंडॆल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात!

एरंडॆल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार?
एकच क्षेत्र ठरलेलं !
दुसरीकडे कुठे जाणार?

कारण आणि परिणाम
यांचं नातं टळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

-मंगेश पाडगांवकर.
या जन्मावर

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

बाळाच्या चिमण्या ओठांतुन हाक बोबडी येते
वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलांनी घेते
नदिच्या काठी सजणासाठी गाणे गात झुरावे

या ओठांनी चुंबुनि घेइन हजारदा ही माती
अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.
दिवस तुझे हे फुलायचे

दिवस तुझे हे फुलायचे
झोपाळ्यावाचून झुलायचे

स्वप्नात गुंगत जाणे
वाटेत भेटते गाणे
गाण्यात हृदय झुरायचे

मोजावी नभाची खोली
घालावी शपथ ओली
श्वासात चांदणे भरायचे

थरारे कोवळी तार
सोसेना सुरांचा भार
फुलांनी जखमी करायचे

माझ्या या घरच्यापाशी
थांब तू गडे जराशी
पापण्या मिटून भुलायचे
-मंगेश पाडगांवकर
डोळ्यात कशाला पाणी

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

- कुसुमाग्रज
जय जय महाराष्ट्र माझा,
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥

गीत : राजा बढे
संगीत : श्रीनिवास खळे
स्वर : शाहीर साबळे
हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट

हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो, खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां,
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या, सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार,
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तोऱ्यामध्ये होऊ नको, उगी अशी ताठ

बोगद्यात गाडी जाता होई अंधार,
अंधारात प्रीत घेता प्रीतिचो आधार
इंजिनाच्या मागे जाती, डबे मागोमाग

गीत : रमेश अणावकर
संगीत : सूरज
स्वर : जयवंत कुलकर्णी व इतर
शोधिसी मानवा, राउळी मंदिरी


शोधिसी मानवा, राउळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी ॥धृ.॥

मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ?
सूर येती कसे, वाजते बासरी ?
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी ॥१॥

गंध का हासतो, पाकळी सारूनी ?
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी
भोवताली तुला, साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी ॥२॥

भेटतो देव का, पूजनी अर्चनी ?
पुण्य का लाभते, दान धर्मातुनी ?
शोध रे दिव्यता, आपुल्या जीवणी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?

गीतकार : वंदना विटणकर
संगीतकार : श्रीकांत ठाकरे
गायक : महंमद रफी
मोरया,मोरया,मोरया,मोरया,
ऐ देवा तुझ्या दारी आलो.....गुणगान गाया...,,,,,,
तुझ्या इना माणसाचा,,,,,, जन्म जाई वाया,,,,,,,,,........
ऐ देवा दिली हाक,,,,,,, उद्धार कराया.......
आभालाची छाया तुझी,,,,,,,, समिद्राची माया......स्स्स्स
मोरया,मोरया ,मोरया ,
मोरया ,मोरया मोरया ,
मोरया ,मोरया ,मोरया ,
मोरया मोरया ,मोरया ,
मोरया ,मोरया ,मोरया ,मोरया..........

ओमकराच रूप तुझ,चराचरा मंधी.....
झाड़ एली पाना संग,फुल तू सुगंधी.....
भक्ताचा पाठीराखा,गरिबांचा वाली....
माझी भक्ति,तुझी शक्ति एकरूप झाली.....

देवा दिली हाक............

मोरया,मोरया, मोरया,
मोरया, मोरया, मोरया,
मोरया, मोरया,

हाती अंत तूच खरा,तूच बुद्धिदाता.....
शरण मी आलो तुला,पायावरी माथा.....
डंका वाजे दहा दिशी,गजर नभाचा....
संकटाला बळ देई,अवतार तेव्हाचा.....

देवा दिली हाक......

मोरया,मोरया,मोरया,मोरया,
मोरया,मोरया,मोरया,मोरया,
मोरया,मोरया,मोरया,मोरया,
मोरया,मोरया,मोरया,मोरया,
देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा


देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता उघड दार देवा

पिते दूध डोळे मिटूनी, जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा

उजेडात होते पुण्य, अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा

स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी
घडोघडी अपराधांचा तोल सावरावा
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥धृ.॥

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥१॥

घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ॥२॥

तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥३॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :प्रपंच - (१९६१)
मराठी पाउल पडते पुढे
खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्टीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे ! ॥धृ.॥

माय भवानी प्रसन्न झाली,
सोनपावले घरास आली
आजच दसरा आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे ॥१॥

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाही
नसतुनी सळसळे !
मराठी पाउल पडते पुढे ॥२॥

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे, सिद्ध् होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ ॥३॥

शुभघडीला शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जय जयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !! ॥४॥

मराठी पाउल पडते पुढे

गीत : शांता शेळके
संगीत : आनंदघन
स्वर : मंगेशकर कुटुंबीय , हेमंतकुमार
चित्रपट : मराठा तितुका मेळवावा [१९६०]
उषःकाल होता होता, काळरात्र झाली


उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली ॥धृ.॥

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ॥१॥

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
अम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली ! ॥२॥

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली ॥३॥

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दु:खाचीही चालली दलाली ! ॥४॥

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली ॥५॥

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे!
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली ! ॥६॥

गीत : सुरेश भट
संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सिंहासन [१९७९]
गोमू माहेरला जाते हो नाखवा


गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा ॥धृ.॥

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ॥१॥

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ॥२॥

सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शिर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
चित्रपट : वैशाख वणवा (१९६४)
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात


नाच रे मोरा , अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच ।

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी , वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ।

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ , काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच ।

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत , खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान , सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ।

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - देवबाप्पा (१९५३)
आहे एक वेडी मुलगी.......!


आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिला
सारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहे का तुला ?

आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,
माहित नाही ''फक्त मित्र '' समजते मला,की त्यापेक्षा जास्त?

तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,
पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले'' व्यवहार!

माहित आहे तिला, आहे मी खुप shy,
एवढे समजून ही ती स्वतच का नाही करत TRY?

''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजू शकतो मी तेवढ,
आयुष्भर ''फक्त मैत्रिण'' रहा सांगायचा आहे तुला एवढ!
बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का?


बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का? आज ओफीसातून जरा लवकर निघ
७.१२ च्या लोकल ची मुद्दामहून विंडो सीट पकड.
घरी जायची ओढ असेल,
पण तू घाई करू नकोस.
वी.टी ते ठाणे जरा ट्रॅक च्या बाजूची बकाल झोपडपट्टी बघ,
बघ ‘राज साहेबांची’ आठवण येते का?
दरम्यान जरा डब्यातले संवाद ऐक,
सगळे हिंदीतून बोलत असतील.
तुझे मित्र,सगे, आप्त् पण.
त्याला आक्षेप घे.
तुझ्या समोर बसलेला उर्मट भैय्या तुझी खिल्ली उडवेल
आणि सारा डब्बा तुझ्यावर फिदी फिदी हसेल.
तेव्हा तुझ्या हाताच्या आवळलेल्या मुठी कडे बघ
बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
ठाणे स्टेशन ला उतर, थोडा १ नंबर वरुन बाहेर ये
रस्त्याच्या कडेला, फूटपाथ वर अनेक सी.डी चे स्टॉल दिसतील
साहजिकच ते भैय्यांचे असतील.
त्यातल्या त्यात जरा व्यवस्थित दिसणार्‍या भैय्या कडे जा,
हळू आवाजात त्याला विचार ब्लू प्रिंट आहे का?
तो बिनधास्तपणे मोठ्याने बोलेल,
“साब अंग्रेजी दु के देसी? मराठी वाली लाने का भी सोच रहे है”
तुझ्या तोंडात शिवी येईल, पण बाहेर पडणार नाही.
बाहेर पडायची असेल तर…………………….
बघ राज साहेबांची आठवण येते का?
तिथे तुला एक तरुण दिसेल,
फुटपाठवरच्या फेरीवल्याना न्याहाळताना.
त्याच्या जवळ जा, त्याला विचार,”मित्रा काय झाल?”
हो! हो तो मराठीत बोलेल,
“काल शर्ट विकत घेतला ब्रॅण्डेड म्हणून पण फटका निघाला.”
फेरीवाल्याला शोधायचा प्रयत्न करू नकोस.
त्याला घरी जायला सांग,तू पण निघ.
पण निघण्या आधी त्या तुटपुंजया पगार घेणार्‍या मराठी तरुणाच्या
डोळ्यात बघायला विसरू नकोस
बघ, बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
सुन्न डोक्याने घरी जा,
उशीर झाला म्हणून बायको आधीच चिंतेत असेल.
फ्रेश हो, जेवण कर.टी.वी बघायची ईछा नसेलच.
बायकोला जरा जवळ घे,तिची चौकशी कर.
प्रॉब्लेम्स ती स्वतःच सांगेल.
आता ती तुझ्या केसात हळूवार बोट फिरवेल
म्हणेल, येत्या खर्चाला १००० रुपये जास्त देशील का?
दूध वाला भैय्या, भाजी वाला भैय्या, इस्त्रि वाला भैय्या,
वॉचमन भैय्या, लिफ्ट वाला भैय्या, झालच तर मूलाना शाळेत सोडणारा रिक्षा वाला भैय्या
यानी जरा पैसे वाढवलेत.
ती तुझी परिस्तिथि समजेल
ताबडतोब ती चेहरा फिरवून निघून जाईल.
तिच्या पाठमोरया आकृती कडे बघ,
म्हण “हो १००० काय २००० देतो”
पण तिला सांगू नकोस तुझ प्रमोशन आहे ते.
तिच्या त्या भैय्या खर्चा कडे बघ.
बघ ‘राजसाहेबांची’ आठवण येते का?
आज तू खुश असशिल
आज तुझ प्रमोशन असेल.
किती वाढणार याची आकडेमोड
काळ झोपेतच झाली असेल.
ठरल्या प्रमाणे सर्व काही होईल,
एक एक करता तुझा नंबर येईल.
बॉस तुला लेटर देईल ,
ते नीट बघ!
प्रमोशन चे नाही ‘टर्मिनेशन’ चे असेल ते.
त्याला काही विचारू नकोस,उलट तोच सांगेल.
“MR पाटील आता आम्हाला MR सिंह भेटलाय,
तुमच्या पेक्षा जास्त वेळ थांबणारा,
आणि तो ही अर्ध्या पगारात.
मराठी येत नाही म्हणून काय झाल?
हिंदी ‘न चुका’ करता येत”
काही बोलू नकोस,
तुझ्या समोर बॉस चा टेबल असेल.
त्याच्या वर एक पपेरवेट ठेवला असेल.
त्याच्या कडे निरखून बघ
बघ,बघ ‘राजसाहेबांची ‘ आठवण येते का?
आता पुन्हा पाऊस येणार...


आता पुन्हा पाऊस येणार,
मग आकाष काळं नीळं होणार,
मग मातीला गंध फुटणार,
मग मधेच वीज पडणार,
मग तूझी आठवण येणार,
काय रे देवा...

मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग मी ती लपवणार,
मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर रडणार,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार...
काय रे देवा...

मग त्याच वेळी दूर रेडियो चालू असणार,
मग त्यात एखादं जुनं गाणं लागलेलं असणार,
मग त्याला एस. डी. बर्मननी चाल दिलेली असणार,
मग साहीलनी ते लिहिलेलं असणार,
मग ते लतानी गायलेल असणार...
मग तूही नेमकं आत्ता हेच गाणं ऐकत असशील का? असा प्रश्न पडणार,
मग उगाच छातीत काहीतरी हुरहुरणार,
मग ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लागणार...
काय रे देवा...

मग खिडक्यांचे गज थंडगार होत जाणार...
मग त्याला आकाशाची आसवं लगडणार,
मग खिडकीत घट्ट बांधून ठेवलेल्या आपल्या पालथ्या मूठीवर ते टपटपणार...
मग पाच फूट पाच इंच देह अपूरा अपूरा वाटणार,
मग ऊरी फुटुन जावसं वाटणार,
छाताडातून ह्रुदय काढून त्या शूभ्र धारेखाली धरावसं वाटणार...
मग सारं कसं मूर्खासारखं उत्कट उत्कट होत जाणार,
पण तरीही श्वासाची लय फक्त कमी जास्त होत राहाणार, पण बंद नाही पडणार,
काय रे देवा...

पाउस पडणार...
मग हवा हिरवी होणार...
मग पाना पानात हिरवा दाटणार,
मग आपल्या मनाच पिवळ पान देठं मोडून हिरव्यात शिरू पहाणार,
पण त्याला ते नाही जमणार्,
मग त्याला एकदम खरं काय ते कळणार, मग ते ओशाळणार,
मग पून्हा शरीराशी परत येणार,
सर्दी होऊ नये म्हणून देहाला वाफ घ्यायला सांगणार,
चहाच्या पाण्यासाठी फ्रीजमध्ये कुडमुडलेलं आलं शोधणार,
एस. डी. चं गाणंही तोपर्यंत संपलेलं असणार,
रेडियोचा स्लॉट भरलेला असणार्,
मग तीच्या जागी ती असणार, माझ्या जागी मी असणार,
कपातल वादळ गवती चहाच्या चवीने पोटात निपचीत झालेलं असणार...
काय रे देवा...

पाउस गेल्यावर्षी पडला,
पाउस यंदाही पडतो...
पाउस पूढच्या वर्षीही पडणार...
काय रे देवा...


कवी - संदीप खरे
खबरदार जर टाच मारुनी - वा. भा पाठक
सावळ्या :

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार :

मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या :

आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा