माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे

मी चालतो अखंड चालायाचे म्हणून
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे
हे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे

मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशा
विझले तिथेच सारे ते मागचे ईशारे

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे
बेसावधास कैसे डसणार हे निखारे?


कवी - विंदा करंदीकर
सब घोडे बारा टक्के!

जितकी डोकी तितकी मते
जितकी शिते तितकी भूते;
कोणी मवाळ कोणी जहाल
कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ
कोणी ढीले कोणी घट्ट;
कोणी कच्चे कोणी पक्के
सब घोडे बारा टक्के!

गोड गोड जुन्या थापा
(तुम्ही पेरा तुम्ही कापा)
जुन्या आशा नवा चंग
जुनी स्वप्ने नवा भंग;
तुम्ही तरी काय करणार?
आम्ही तरी काय करणार?
त्याच त्याच खड्ड्या मधे
पुन्हा पुन्हा तोच पाय;
जुना माल नवे शिक्के
सब घोडे बारा टक्के!

जिकडे सत्ता तिकडे पोळी
जिकडे सत्य तिकडे गोळी;
(जिकडे टक्के तिकडे टोळी)
ज्याचा पैसा त्याची सत्ता
पुन्हा पुन्हा हाच कित्ता;
पुन्हा पुन्हा जुनाच स्वार
मंद घोडा जुना स्वार;
याच्या लत्ता त्याचे बुक्के
सब घोडे बारा टक्के!

सब घोडे! चंदी कमी;
कोण देईल त्यांची हमी?
डोक्यावरती छप्पर तरी;
कोण देईल माझा हरी?
कोणी तरी देईन म्हणा
मीच फसविन माझ्या मना!
भुकेपेक्षा भ्रम बरा;
कोण खोटा कोण खरा?
कोणी तिर्र्या कोणी छक्के;
सब घोडे बारा टक्के!


कवी - विंदा करंदीकर
मी

कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
कधी वाढता वाढता व्योम व्यापी
कधी धावतो विश्व चुंबावयाला
कधी आपणाला स्वहस्तेच शापी

कधी याचितो सत कधी स्वप्न याची
कधी धावतो काळ टाकुन मागे
कधी वर्षतो अमृताच्या सरी अन
कधी मृत्युच्यी भाबडी भीक मागे

कधी दैन्यवाणा, निराधर होई
कधी गुढ, गंभीर, आत्मप्रकाशी
कधी गर्जतो सागराच्या बळाने;
कधी कापतो बोलता आपणाशी!

कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
कधी पाहतो आत्मरुपात सारे;
कधी मोजीतो आपणाला अनंते
अणुरुप होती जिथे सुर्य, तारे

टळेना अहंकार साध्या कृतीचा;
गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

कधी संयमी, संशयात्मा, विरागी
कधी आततायी, कधी मत्तकामी
असा मी... तसा मी... कसा मी कळेना;
स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी!


कवी - विंदा करंदीकर
सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर
तेच ते...

सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!
माकडछाप दंतमंजन,
तोच चहा तेच रंजन
तीच गाणी तेच तराणे,
तेच मूर्ख तेच शहाणे
सकाळपासुन रात्रीपर्यंत
तेच ते तेच ते

खानावळीही बदलून पाहील्या
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.
काकू पासून ताजमहाल,
सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला,
तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी,
तेच ते आंबट सार
सुख थोडे दु:ख फार

संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळे
त्या स्वप्नाचे शिल्पकार,
कवि थोडे कवडे फार
पडद्यावरच्या भूतचेष्टा;
शिळा शोक, बुळा बोध
नऊ धगे एक रंग,
व्यभिचाराचे सारे ढंग
पुन्हा पुन्हा तेच भोग
आसक्तीचा तोच रोग
तेच ' मंदिर ' तीच ' मूर्ती '
तीच ' फुले ' तीच ' स्फुर्ती '
तेच ओठ तेच डोळे
तेच मुरके तेच चाळे
तोच पलंग तीच नारी
सतार नव्हे एकतारी

करीन म्हटले आत्महत्त्या
रोमिओची आत्महत्त्या
दधीचिची आत्महत्त्या
आत्महत्त्याही तीच ती
आत्मा ही तोच तो
हत्त्याही तीच ती
कारण, जीवनही तेच ते
आणि मरणही तेच ते


कवी - विंदा करंदीकर
अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात;
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून,
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून
तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिंदकळणारे
धुंदमदिर निळे तळे.

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता
पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना.

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची.
तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला.
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
राधे, पुरुष असाही असतो!


कवयित्री - अरुणा ढेरे
राधा ही बावरी

रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी ।


कवी - अशोक पत्की
अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा

अंदाज आरशाचा, वाटे, खरा असावा
बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा

जखमा कशा सुगंधी, झाल्यात काळजाला
केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा

नाही अखेर कळले, नौका कशी बुडाली
भयभीत काठ सांगे, तो भोवरा असावा

का आळ खंजिरावर, घेता तुम्ही खुनाचा?
की वाटले तुम्हाला, तो सोयरा असावा!

काठावरी उतरली, स्वप्ने तहानलेली
डोळ्यात वेदनेचा, माझ्या, झरा असावा

भेटून वादळाला, इतुके विचार आता
शाबूत एवढाही, का, कोपरा असावा

दारात ती उभी अन्‌, नयनी अबोल अश्रू
लाचार ती असावी, तो, उंबरा असावा

माथ्यावरी नभाचे, ओझे सदा "अलाही'
दाही दिशा कशाच्या, हा, पिंजरा असावा


कवी- इलाही जमादार
तुझी वंचना, साधना, होत आहे

तुझी वंचना, साधना, होत आहे
तुलाही आता, वेदना, होत आहे

पुन्हा मेघ आलेत, आश्र्वासनांचे
पुन्हा एकदा, गर्जना, होत आहे

जशी लागली, ओहटी आसवांना
मनाचा किनारा, सुना होत आहे

जरा कुंडलीला, विचारून बघ तू
मनोकामना, वासना होत आहे

नवा क्षण, नवा क्षण, नवा क्षण कशाचा
नव्याने म्हणेतो, जुना होत आहे

कशाला उगी, फुगवटा पाहिजे रे
तुझे बोलणे, वल्गना होत आहे

शिळा एक होती, घडविलीस मूर्ती
मलाही अता, भावना होत आहे

तुला स्पर्श केला, असा भास झाला
किती गोड, संवेदना होत आहे

जिथे तू तिथे मी, जिथे मी तिथे तू
दुरावा `इलाही', गुन्हा होत आहे

कवी - इलाही जमादार
वादळवेडी...

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात...

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात

कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात

तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात

नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


कवी - कुसुमाग्रज
नदी

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी

नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही

शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय

कवी - कुसुमाग्रज
अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !


कवी - कुसुमाग्रज
जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे
मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"
आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात
मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !
पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;
असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !

कवी - कुसुमाग्रज
अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज
मी फुल तृणातील इवले

रे तुझीया सामर्थ्याने ढळतील दिशा हि दाही,
मी फुल तृणातील इवले उमलणार तरीहि नाही

शक्तीने तुझीया दिपुनी, तुज करतील सारे मुजरे,
पण सांग कसे उमलावे, ओठातील गाणे हसरे

जिंकिल मला दवबिंदु, जिंकिल तृणातील पाते,
अन स्वताःस विसरून वारा, जोडील रेशमी नाते

कुरवाळीत येतील मजला, श्रावणातल्या जळधारा
सळ्ऽसळून भिजली पाने, करतील मज सजल इशारा

रे तुझीया सामर्थ्याने, मी मला कसे विसरावे
रंगाचे अन्ऽ गंधाचे, मी गीत कसे गुंफावे

शोधीत धुक्यातूनी मजला, दवबिंदू होऊनी ये तु
जणु भिजलेल्या मातीचा, सजल सुगंधीत हेतू

तु तुलाच विसरून यावे, मी तुझ्यात मज विसरावे
तु हसत मला फुलवावे, मी नकळत आणि फुलावे
हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात!

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गन्ध्, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात

- शिरीष पै
मैत्री

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी ..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून ,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी ...

कधी शिकवण कधी आठवण ,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण ...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी ,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी .........


माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा ,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा ..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा ...

पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय ,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय ..
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी .....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ......
मैत्री कधी ठरवून होत नाही

आपण आपल्या वाटवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात....

एकमेकांत येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळत कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालु लागतो...

नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो
एकमेकाला सोबत करतो
एकमेकाची दु:खे वाटुन घेतो
आणि आनंदाचे क्षण साजरे करतो...

मैत्री अशी होते..!

काय जादु असते मैत्रीत!
मैत्री शिववते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलुन टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास...

कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्याची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच - शिंपले ....
विविध रंगाचे... विविध आकाराचे ... विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एक शिंपला उचलुन घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा ....!
एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात...
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय...

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप , मध्येच माघार घेऊ नकोस...!
ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे

लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे

लक्शिमिच्या हतातली चवरि व्हावी वर खाली
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरसंगं गाउ दे !

सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा