माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ
सांग कुठ ठेवू माथा कळनाच काही
देवा कुठ शोधू तुला मला सांग ना
प्रेम केल एवढाच माझा रे गुन्हा .…।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी
हे आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..…

का कधी कुठे, स्वप्न विरले , प्रेम हरले
का कधी कुठे, स्वप्न विरले , प्रेम हरले
स्वप्न माझे आज नव्याने फुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले ……।

आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी ……।

का रे तडफड हि ह्या काळजामधी,
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जन्म घे
डाव जो मांडला , मोडू दे…

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तराला प्रश्न कसे हे पडले
अंतराचे अंतर कसे न कळले …।

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी
हे आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..

बाजार फुलांचा भरला


बाजार फुलांचा भरला, मज तुळस दिसेना
ही प्रीत जगाची खोटी, मज बहीण मिळेना

मज एक हवी ती माया, वणवणतो फिरतो वाया
मी कुठवर चालत राहू, का मार्ग सरेना
मज बहीण मिळेना

हातात फुलांचा गजरा, वखवखल्या कामुक नजरा
या दलदल चिखलामधुनी, का कमळ फुलेना
मज बहीण मिळेना

का आज तमाशा बघता ? उघड्यावर अब्रू विकता
का किडे होऊन जगता, का जगता जगता मरता
या जगण्या-मरण्या मधला मज अर्थ कळेना
मज बहीण मिळेना
विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ||

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा || 1 ||

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा || 2 ||

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा || 3 ||

आयुष्यावर बोलू काही.


जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही।

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्‌या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही।

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे, कातर बोलू काही।

उद्याउद्याची किती काळजी? बघ रांगेतून र्
’परवा’ आहे उद्याच नंतर बोलू काही।

शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर! बोलू काही।

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा ॥धृ.॥

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा ॥१॥

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा ॥२॥

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा


केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||


दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहसी अनंता ||धृ.||

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ||१||

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे ध्यान देसी तुझ्या प्रिय संता ||२||

तूच जन्मदाता तूचि विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता ||३||

टाळ बोले चिपळीला

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा