माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे

जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे
त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे
ते श्वास कापरे अन्‌ आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन्‌ सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे
नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे ?
मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरुन येते हातात वंचना रे
हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी तुझी कळी ही बघते वळून मागे
का पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे ?
गीत – मंगेश पाडगावकर
आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !
शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !
वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !
आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !
फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !
निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !
आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !
- मंग॓श पाडगांवकर
मी बोलले न काही नुसतेच पाहिले

मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले
परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले
मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले
देऊन सर्व काही नाही दिलेच काही
ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही
माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले
निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले
गीत – मंगेश पाडगावकर
कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही
कळते मला अरे हा माझा वसंत नाही
हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला
समजू नकोस माझ्या फसण्यास अंत नाही
जमवूनही तुझ्याशी माझेतुझे जमेना
इतका तुझ्याप्रमाणे मी शोभिवंत नाही
मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे
सारीच माणसे अन् कोणीच संत नाही
थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे..
रस्त्यास वाहणार्‍या कसलीच खंत नाही
मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही
दारात दु:खितांच्या मी शब्द मागणारा
(तितकी अजून माझी कीर्ती दिगंत नाही)
मी रंग पाहिला ह्या मुर्दाड मैफलीचा..
कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही!
– एल्गार, सुरेश भट
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो !
चिराचिरा जुळला माझा, आत दंग झालो !
सल जुनेच सलता सलता सुखावून गेले !
अन्‌ हळूच गुणगुणती हे वळ न मोजलेले !
कशी कथा सरता सरता पूर्वरंग झालो !
किरण एक धरुनी हाती मी पुढे निघालो !
अन्‌ असाच वणवणताना मी मला मिळालो !
सर्व संग सुटले; माझा मीच संग झालो !
ज्ञानदेव लिहुनी गेले ओळओळ भाळी !
निमित्तास माझे गाणे, निमित्तास टाळी !
तरू काय ? इंद्रायणिचा मी तरंग झालो !
कुठे दिंड गेली त्यांची कळेना बिचारी !
मी इथेच केली माझी सोसण्यात वारी !
’पांडुरंग’ म्हणता म्हणता ’पांडुरंग’ झालो !
गीत – सुरेश भट
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !
तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो !
असेच रोज नाहुनी
लपेट उन्ह कोवळे,
असेच चिंब केस तू
उन्हात सोड मोकळे
तुझा सुगंध मात्र मी इथे हळुच हुंगतो !
अशीच रोज अंगणी
लवून वेच तु फुले,
असेच सांग लजुनी
कळ्यांस गूज आपुले;
तुझ्या कळ्या,तुझी फुले इथे तिपुन काढतो !
अजून तू अजाण ह्या,
कुवार कर्दळीपरी;
गडे विचार जणत्या
जुईस एकदा तरी :
“दुरुन कोण हा तुझा मरंद रोज चाखतो?”
तसा न राहिला अता
उदास एकटेपणा;
तुझी रुपपल्लवी
जिथे तिथे करी खुणा;
पहा कसा हवेत मी तुझ्यासवे सळाळतो !
- सुरेश भट
काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!

काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो!
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो!
चारचौघांसारखे मज बोलणे जमलेच नाही,
सांग तू आता शहाण्या, काय मी बरळून गेलो?
मी अता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे…
जन्मठेपेतून माझ्या आज मी निसटून गेलो!
का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो?
मी तुम्हासाठीच तेव्हा कोरडा बहरून गेलो!
आज कैशी आपुली ही भेट ताटातूट झाली?
भेटतांना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो?
मी चुका केल्या तरीही काय हे नाही परेसे?
मी करोडो माणसांची अंतरे उजळून गेलो!
जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला-
मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो!
- सप्तरंग, सुरेश भट
मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही

मी अश्रूंच्या डोहामध्ये बुडलो नाही
तसा वेदनेला ही मी आवडलो नाही
अता किनारे आणि बंधने कशास मजला
पापण्यांत जर कधी कुणाच्या अडलो नाही
मान्य मला मी इथे यायला नकोच होते
उजाड स्वप्ने बघून ही गडबडलो नाही
मी सूर्याचे वार झेलले छाती वरती
कधी सावलीआड स्वतःच्या दडलो नाही
दूर तुला जाताना येथे पहात होतो
निघून गेले प्राण तरी तडफडलो नाही
फूल कसे हे फुलण्या आधी सुकून गेले
कलेवरावर कधी मनाच्या रडलो नाही
काल भेटली तेव्हा ती पूर्वीगत हसली
मी ही अन रडताना मग अवघडलो नाही
शब्द म्हणाले सर्व भावना निघून गेल्या
हाय कधी अर्थाला मी सापडलो नाही
- सुरेश भट
मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे

मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जीवाला गुंतवावे..
लागुनि थंडी गुलाबी, शिरशिरी यावी अशी ही
राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे..
कापर्‍या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे, पुन्हा तू पेटवावे..
रे तुला बाहुत माझ्या, रुपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे, तू मला बिलगून जावे…

- सुरेश भट
मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग…
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग…
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग…
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग…
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग…
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग….

- सुरेश भट
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

- सुरेश भट
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू…
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला…
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे….
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी…
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…

- एल्गार, सुरेश भट
हासताना प्राण गेला का तुला आले रडे?

हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे!
का अशी मागून ही
ढाळशी तू आसवे?
संपलो केव्हाच मी
त्या तुझ्या स्वप्नासवे.
तारकांनाही न आता खूण माझी सापडे!

तू असा छेडू नको
अंतरीचा जोगिया;
हो चिता माझी पुन्हा
लागली जागावया.
ही पहा ही राख माझी वारियासंगे उडे!

एकदा नेञी तुझ्या
चांदणे मी वेचले;
एकदा ओठी तुझ्या
गीत माझे गुंफिले.
आज अस्थाईच माझी अंतऱ्यापाशी अडे!

- सुरेश भट
मी फूल तृनातील इवले

जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दाही दिशा
मी फूल तृनातील इवले
उमलणार तरीही नाही...

शक्तिने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातिल गाणे हसरे ?

जिंकिल मला दवबिंदू
जिंकिल तृनाचे पाते
अन् स्वतास विसरुनी वारा
जोडील रेशमी नाते...

कुरुवाळीत येतील मजला
श्रावणातिल जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा...

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन् रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुम्फावे?

शोधित धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीत
मृदु सजल सुगन्धित हो तू !

तू मलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे...
तू हसत मला फूलवावे
मी नकळत आणि फूलावे.....

जिप्सी - मंगेश पाडगावकर

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा