माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


आयुष्यावर बोलू काही.


जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही।

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्‌या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही।

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे, कातर बोलू काही।

उद्याउद्याची किती काळजी? बघ रांगेतून र्
’परवा’ आहे उद्याच नंतर बोलू काही।

शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणूनी
वाट आंधळी प्रवास खडतर! बोलू काही।

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर, सरसरतो मधु शिरवा ॥धृ.॥

भिजूनी उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा ॥१॥

मनभावन हा श्रावण, प्रियसाजण हा श्रावण
भिजवी तन, भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरांवर, प्रणयी संकेत नवा ॥२॥

नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा


केशवा माधवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा ||

तुझ्या सारखा तूच देवा
तुला कुणाचा नाही हेवा
वेळोवेळी संकटातुनी तारिसी मानवा ||

वेडा होऊनी भक्तीसाठी
गोप गड्यांसह यमुनाकाठी
नंदाघरच्या गाई हाकीशी गोकुळी यादवा ||

वीर धनुर्धर पार्थासाठी
चक्र सुदर्शन घेऊनी हाती
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा ||


दर्शन दे रे, दे रे भगवंता

दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पाहसी अनंता ||धृ.||

माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्‍या कुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता ||१||

ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे ध्यान देसी तुझ्या प्रिय संता ||२||

तूच जन्मदाता तूचि विश्वकर्ता
मन शांत होई तुझे गुण गाता
हीच एक आशा पुरवी तू आता ||३||

टाळ बोले चिपळीला

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥धृ॥
दरबारी आले रंक आणि राव
सारे एकरूप नाही भेदभाव
गाऊ नाचू सारे होऊनी नि:संग ॥१॥
जनसेवेपायी काया झिजवावी
घाव सोसुनिया मने रिझवावी
ताल देऊनी हा बोलतो मृदंग ॥२॥
ब्रम्हानंदी देह बुडूनिया जाई
एक एक खांब वारकरी होई
कैलासाचा नाथ झाला पांडुरंग ॥३॥

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा