माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


सहानभूती - कुसुमाग्रज
सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकान्ची होय दाट गर्दी

प्रभादिपान्ची फ़ुले अन्तराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोपर्याशी गुणगुणत अन अभन्ग
उभा केव्हाचा एक तो अपन्ग

भोवतीचा अन्धार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसान्चा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दिना त्या उभारुनी उर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिन बन्धू वाट

आणी धनिकान्ची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात.
मौन - कुसुमाग्रज


शिणलेल्या झाडापाशी
कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का ?
झाड बोललं नाही
कोकिळा उडून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
सुग्रण आली
म्हणाली, घरटं बांधु का ?
झाड बोललं नाही
सुग्रण निघून गेली.

शिणलेल्या झाडापाशी
चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपु का ?
झाड बोललं नाही
चंद्रकोर मार्गस्थ झाली.

शिणलेल्या झाडापाशी
बिजली आली
म्हणाली, मिठीत येऊ का ?
झाडाचं मौन सुटलं
अंगाअंगातुन
होकारांच तुफान उठलं.

(मुक्तायन)
दोन याचक - कुसुमाग्रज

कुसुमाग्रजांची ही कविता त्यांच्या इतर कवितांइतकी जरी गाजलेली नसली, तरी त्यांच्यासारखीच अव्वल दर्जाची आहे, यात शंका नाही. एका घटनेचे, त्यांनी या कवितेतून अगदी साध्या आणि ओघवत्या भाषेत चित्रदर्शी वर्णन केले आहे. पोटासाठी वेगवेगळ्या प्रकारे शरीर विकणारे आणि जगाच्या खिजगणतीतही नसणारे भिकारीण आणि सैनिक असे दोन अनामिक जीव एकत्र येतात आणि आपापल्या भुका शांत करतात. दोन्हीमध्ये अनैतिक असे काहीच नाही, असेलच तर ती आदिम काळापासून सोबत करणारी भूक - शरीराची किंवा पोटाची.

दोन याचक

मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!
निरोप - कुसुमाग्रज

( पुढील कविता ही माझा मित्र आणि ह्या संग्रहाचा सह-संकलक - किरण रानडे - ह्याच्या आईच्या स्मरणानुसार उद्धृत करीत आहे. जाणकारांकडून सुधारणांची अपेक्षा आहे. माझे श्वसुर - श्री. शशिकांत दात्ये - ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या कवितेची पार्श्वभूमी ही फाळणीच्या काळात पूर्व पाकिस्तानात घडलेल्या एका प्रसंगाची आहे. पूर्व पाकिस्तानातून फाळणीनंतर भारतात यायला निघालेल्या एका विमानात एक माता आपल्या कोवळ्या मुलाला सोडून देते, असा काहिसा तो प्रसंग होता. ह्याही संदर्भात कुणा जाणकार रसिकांस काही माहिती असेल तर ती अवश्य द्यावी.)

गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!
मातीची दर्पोक्ति - कुसुमाग्रज

घनधार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य
त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य,
उन्माद चढे, तो दर्प दर्वळे भोती
थरथरा कापली वर दर्भाची पाती
ते सुस्त धूलिकण गाउ लागले गीत

कोलाहल घुमला चहूकडे रानात-
अभिमानी मानव ! आम्हाला अवमानी !
बेहोष पाउले पडती अमुच्यावरुनी
त्या मत्त पदांना नच जाणीव अजूनी
की मार्ग शेवटी सर्व मातिला मिळती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
दर्पणी पाहु द्या रमणि रूप दर्पात
वा बाहू स्फुरु द्या बलशाली समरात
पांडित्य मांडु द्या शब्दांचा आकांत

ते रूप, बुद्धि ती, शक्ति, आमुची भरती,
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
पाहून हासु ये तुमचे ताजमहाल
अन् गर्व किती तो ! काल काय जिंकाल ?

शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
धनवंत असू द्या, असु द्या दीन भिकारी
कुणि संत असू द्या वा पापी व्यभिचारी
इकडेच वाहते सर्वांची रहदारी
हो भस्म चितेवर सारी नीति-अनीति
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
मरणोत्तर वाटे होइल आशापूर्ति

स्वर्गीय मंदिरें घ्यायाला विश्रांति
लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीति
त्या व्याकुल मतिला इथेच अंतिम शांती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण ?
बेताल नाचवी, सूत्रधार हा कोण ?
मातीतच अंती त्याचेही निर्वाण ?
स्वामित्व जगाचे अखेर अमच्या हाती
मातीवर चढणे एक नवा थर अंती !
निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !
माझे जगणे होते गाणे

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा