माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


Showing posts with label ग. दि. माडगूळकर. Show all posts
Showing posts with label ग. दि. माडगूळकर. Show all posts
एका तळ्यात होती - ग.दि.माडगुळकर

एका तळ्यात होती,
बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

कोणी न त्यास घेई,
खेळावयास संगे
सर्वाहूनी निराळे
ते वेगळे तरंगे

दावूनि बोट त्याला,
म्हणती हसून लोक
आहे कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

पिल्लास दुःख भारी,
भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी,
सांगेल ते कुणाशी ?

जे ते तयास टोची,
दावी उगाच धाक
आहे कुरुप वेडे,
पिल्लू तयात एक

एके दिनी परंतू,
पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे,
वार्‍यासवे पळाले

पाण्यात पाहताना,
चोरुनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले,
तो राजहंस एक
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार


फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥धृ.॥

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥१॥

घटा घटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ॥२॥

तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडीसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥३॥

गीतकार :ग. दि. माडगुळकर
गायक :सुधीर फडके
संगीतकार :सुधीर फडके
चित्रपट :प्रपंच - (१९६१)
गोमू माहेरला जाते हो नाखवा


गोमू माहेरला जाते हो नाखवा
तिच्या घोवाला कोकण दाखवा ॥धृ.॥

दावा कोकणची निळी निळी खाडी
दोन्ही तीराला हिरवी हरवी झाडी
भगवा अबोली फुलांचा ताटवा ॥१॥

कोकणची माणसं साधी भोळी
काळजात त्यांच्या भरली शहाळी
उंची माडांची जवळून मापवा ॥२॥

सोडून दे रे खोड्या साऱ्या
शिडात शिर रे अवखळ वाऱ्या
झणी धरणीला गलबत टेकवा ॥३॥

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : दत्ता डावजेकर
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
चित्रपट : वैशाख वणवा (१९६४)
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात


नाच रे मोरा , अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच ।

ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी , वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ।

झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ , काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच ।

थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत , खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।

पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
आभाळात छान छान , सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ।

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - पु. ल. देशपांडे
स्वर - आशा भोसले
चित्रपट - देवबाप्पा (१९५३)

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा