माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टरकमी पडते

ही कविता आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ! कवीचे नाव माहीत नाही, परंतु तो नक्कीच डोळस आहे!
दर पार्टीच्या शेवटी एक क्वार्टर कमीच पडते !


दारु काय गोष्ट आहे
मला अजुन कळली नाही
कारण प्रत्येक पिणारा म्हणतो
मला काहीच चढली नाही


सर्व सुरळीत सुरु असताना
लास्ट पेग पाशी गाडी अडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा प्रोग्राम म्हणजे जणु
विचारवंतांची गोलमेज परीषदच भरते
रात्री दिलेला शब्द प्रत्येक व्यक्ती
सकाळच्या आत विसरते


मी इतकीच घेणार असा
प्रत्येकाचा ठरलेला कोटा असतो
पेग बनवणारा त्यदिवशी
जग बनवणार्‍यापेक्षा मोठा असतो


स्वताच्या स्वार्थासाठी
प्यायच्या आग्रहाची फेरी घडते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते...


पिण्याचा कार्यक्रम म्हणजे पिणार्‍याला
दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांना अकँडेमीक्सपेक्षा
पिण्याच्या क्षमतेवर श्रद्धा असते


आपण हीच घेतो म्हणत
ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवतात
वेळ आली आणि पैसा नसला की
देशीवरही तहान् भागवतात


शेवटी काय
दारु दारु असते
कोणतीही चढते...

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते

पिणार्‍यामध्ये प्रेम हा
चर्चेचा पहिला विषय आहे
देवदासचे खरे प्रेम 'पारो की दारु '
याचा मला अजून संशय आहे


प्रत्येक पेग मागे तीची
आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो
ती चांगल्या घरी पडली असते


तीच्या आठवणीत थर्टीची लेवल
लगेच सिक्स्टीला भिडते...

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !


चुकून कधीतरी गंभीर विषयावरही
चर्चा चालतात
सगळे जण मग त्यावर
P.HD. केल्यासारखे बोलतात


प्रत्येकाला वाटते की त्यालाच
यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा
गावच्या पोटनिवडणूकीकडे वळते


जसा मुद्दा बदलतो
तशी आवाजाची पातळी वाढते

आणि दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत्
यांच्यासारखा हात नाही
ऐरवी सिंगल समोसा खाणारा
गोष्टीत पीझ्झाशीवाय् खात नाही


पैशे पैशे काय आहे ते फक्त
खर्च करण्यासाठीच असतात
पेगजवळ झालेली अशी गणिते
सकाळी चहाच्या कटींगपाशी फसतात


रात्री थोडी जास्त झाली
की मग त्याला कळते

पण दर पार्टीच्या शेवटी
एक क्वार्टर कमी पडते !

यांच्यामते मद्यपान हा
आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पिण्यामागे सायन्स
तर देशी पिण्यामागे आर्ट आहे


यामुळे धीर येतो, ताकद येते
यात वेगळीच मजा असते
आयुष्यभराची मवाळ व्यक्ती
त्या क्षणी राजा असते

दारुमुळे आपल्याला घराच्या
चिवड्याचे महत्व कळते...

परंतु दर पार्टीच्या शेवटी
ऐक क्वार्टर कमी पडते !!!
जयोस्त्तु ते


जयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांची
स्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लाली
तूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।

मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।

हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजविण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसे करण्याला
सुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।

स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुला
कोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीला
ही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतां
कां तुवां ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्यांची दासी झाली
जीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें दे
स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।
हिंदु नृसिंह

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगलें
परदास्य-पराभविं सारीं । मंगलें
या जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु दे
ती बुध्दि भाबडया जीवां । लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी । वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।
सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या

सुन्यासुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

उगीच स्वप्नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे ?

कळे न तू पाहशी कुणाला ? कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे तुझे हसू आरशात आहे !

उगाच देऊ नकोस हाका, कुणी इथे थांबणार नाही
गडे, पुन्हा दूरचा प्रवासी कुठेतरी दूर जात आहे

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !


गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा (१९७७)
राग - पटदीप (नादवेध)
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रंगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी


गीत - सुरेश भट
संगीत - कौशल इनामदार

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा