माय मराठी

ज्या भाषेने मला बोलायला शिकवले,
हसायला शिकवले....
जगायला शिकवले....
तिच्यासाठी.....

या ब्लॉग वरील कविता माझ्या नाहीत, हा कवितांचा एक संग्रह आहे. तरी एखाद्या कॉपी राईट चा भंग होत असल्यास कृपया ajaynarewade@yahoo.co.in वर ईमेल करावा. ती कविता लगेच काढून टाकण्यात येईल. आणि त्यामधून आपणास झालेल्या मन:स्तापाबद्दल क्षमा असावी....

---- अजय नरेवाडे


मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसात, लाभला निवांत संग…
त्या तिथे फुलाफुलात, पेंगते अजून रात
हाय तू करु नकोस, एवढयात स्वप्न भंग…
दूर दूर तारकांत, बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रुपरंग…
गार गार या हवेत घेऊनी मला कवेत
मोकळे करुन टाक एकवार अंतरंग…
ते तुला कसे कळेल, कोण एकटे जळेल
सांग का कधी खरेच, एकटा जळे पतंग…
काय हा तुझाच श्वास, दरवळे इथे सुवास
बोल रे हळू उठेल, चांदण्यावरी तरंग….

- सुरेश भट
तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे

तरुण आहे रात्र अजूनि, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती हृदयात माझ्या, अमृताच्या धूंद लाटा
तू किनार्‍या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजूनि बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे

- सुरेश भट
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…
उगीच वेळ सारखी, विचारतास जाय तू,
पून्हा पून्हा मिठीतही शहारतोस काय तू…
अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला,
अजून पाकळ्यातला मरंदही नही संपला…
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे….
अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी…
उजाडल्या वरी सख्या निघूनी जा घराकडे,
अजुनही उशीवरी टिपूर चांदणे पडे…

- एल्गार, सुरेश भट
हासताना प्राण गेला का तुला आले रडे?

हे पहा हे लोक सारे कोरडेच्या कोरडे!
का अशी मागून ही
ढाळशी तू आसवे?
संपलो केव्हाच मी
त्या तुझ्या स्वप्नासवे.
तारकांनाही न आता खूण माझी सापडे!

तू असा छेडू नको
अंतरीचा जोगिया;
हो चिता माझी पुन्हा
लागली जागावया.
ही पहा ही राख माझी वारियासंगे उडे!

एकदा नेञी तुझ्या
चांदणे मी वेचले;
एकदा ओठी तुझ्या
गीत माझे गुंफिले.
आज अस्थाईच माझी अंतऱ्यापाशी अडे!

- सुरेश भट
मी फूल तृनातील इवले

जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दाही दिशा
मी फूल तृनातील इवले
उमलणार तरीही नाही...

शक्तिने तुझिया दिपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उमलावे
ओठातिल गाणे हसरे ?

जिंकिल मला दवबिंदू
जिंकिल तृनाचे पाते
अन् स्वतास विसरुनी वारा
जोडील रेशमी नाते...

कुरुवाळीत येतील मजला
श्रावणातिल जलधारा
सळसळून भिजली पाने
मज करतील सजल इशारा...

रे तुझिया सामर्थ्याने
मी कसे मला विसरावे?
अन् रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुम्फावे?

शोधित धुक्यातून मजला
दवबिंदू होवुनी ये तू
कधी भिजलेल्या मातीत
मृदु सजल सुगन्धित हो तू !

तू मलाच विसरुनी यावे
मी तुझ्यात मज विसरावे...
तू हसत मला फूलवावे
मी नकळत आणि फूलावे.....

जिप्सी - मंगेश पाडगावकर

जाणता राजा

जाणता राजा
जाणता राजा