श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे - यशवंत देव
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे
आहे फुलात काटा तोही पसंत आहे
दुःखावरी मुलामा देऊन तू सुखाचा
जे वाटतोस ते ते सारे पसंत आहे
विरता जुने प्रहार पडती नवीन घाव
तक्रार सांगण्याला कोठे उसंत आहे
मी भोगल्या व्यथांना साक्षी कुणी कशाला
माझाच एक अश्रू अजुनी जिवंत आहे
कधि सांगता न आल्या शब्दात प्रेमगोष्टी
श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे
No comments:
Post a Comment
Leave your comment here