म्हणालो नाही...
तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी ?' ते ही 'सांग' म्हणालो नाही,
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही...
मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती,
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी
'जा! फिटले सारे पांग!' म्हणालो नाही...
बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही...
बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी,
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग - म्हणालो नाही...
हे श्रेय न माझे! तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे,
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग - म्हणालो नाही...
कवी - संदीप खरे
No comments:
Post a Comment
Leave your comment here