मंद असावे जरा चांदणे - बा. भ. बोरकर
मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
गर्द कुंतलि तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी
दूर घुमावा तमांत पावा,जवळच व्याकूळ व्हावे पाणी
तूही कथावी रुसून अकारण सासू नणंदाची गाऱ्हाणी
सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे
आणि आंधळ्या भलेपणी मी तुला केधवा छळिले कैसे
उदासता अन सुखात कोठे कौलारांवर धूर दिसावा
असे निसटते बघून काही विषाद व्हावा जीवा विसावा
मंद असावे जरा चांदणे कुंद असावी हवा जराशी
करुणाभरल्या मुकाटपणी अन तुला धरावे जरा उराशी
No comments:
Post a Comment
Leave your comment here